माझी पुन्हा एकदा शाळा "वारी" !!!!

**** माझी पुन्हा एकदा शाळा "वारी" !!!!
माझा मुलगा ३री ला एका शाळेत आहे. आता नाव नका विचारू,कारण कुठल्याही शाळेत येणाराच अनुभव मी सांगणार आहे.
दिवस उन्हाळ्याचे, साधारण वार्षीक परीक्षेचे. ४२ डिग्री तापमानामुळे "वरून" आदित्यमहाराज सर्वांचीच पूर्ण परीक्षा घेत होते. अशा या परीक्षेच्या काळात काही सुसह्याता म्हणून मी बापुडा , बरमुडा आणि टि शर्ट घालून बाहेर बँक कामाला गेलेलो. इतक्यात बायकोचा फोन आला "नेहमीप्रमाणे विसरलात ना, आज आपल्या बोक्या च्या शाळेत जायचे होते , पुढील वर्षाची फी भरायला, आज शेवटचा दिवस आहे.नाहीतर पुढच्या वर्गात नंतर ऍडमिशन मिळणार नाही". माझ्या अंगावर काटा आला, मला नोकरीवरून काढून टाकील म्हंटले तरी फार त्रास होत नाही पण मुलाला दुसरी शाळा बघा म्हटले की माझ्या डोळ्यासमोर अंधारी येते. म्हणून तडक पोहोचलो बोक्याच्या शाळेत.
गेटमधून ऐटीत आत शिरायला लागलो तितक्यात सुरक्षा राक्षकाने (हो राक्षसच !) शिटी वाजवली ओरडला " आत जाता येणार नाही , मागे या ! " अरे बापरे, मला ब्लॅकलिस्ट केलं की काय? मनात शंका आली. म्हटलं "फीस भरायला चाललोय" तर तो म्हणतो कसा " साहेब अशी हाफ पॅन्ट घालून जाता येणार नाही,नीट कपडे घालून या ". मी चपापलोच, मला वाटलं तो माझी गम्मतच करतोय.
म्हटलं " गम्मत करता का सेक्युरिटी साहेब, जाऊ द्या अगोदरच उशीर झालाय" तो अजून गरम झाला जणू काही मी बिनचड्डीचाच फिरतोय. "जाता येणार नाही, ऑर्डरच आहे तशी". "कुणाची ऑर्डर , हे कधी झालं, मी तर बऱ्याचदा येतो असाच हाल्फ चड्डीत " तो वैतागला " तुम्हाला काय सांगायचं ते सरांना सांगा " तितक्यात एक चमकणारे डोके आणि वैतागलेले डोळे घेऊन एक गृहस्थ आले आणि क्षणाचाही विलंब न करता माझ्यावर खेकसले "कितीदा नोटिसा पाठवल्या पारेन्ट्सला पण तुम्हाला कळत कसा नाही?" त्याच्या जरबीत आणि आवाजात एक राजेशाही थाट होता. तोच पी टी टीचर हे लगेच लक्षात आले. एकदम माझा थाट हवेतून जमिनीत कोसळला. मनात पुन्हा मला माझी शाळाच आठवली, २५ वर्ष झाली पण तीच भीती. मनातून पुन्हा शाळेची वारी झाली ! तेच रोखलेले डोळे आणि तीच माझी बोबडी वळलेली. भानावर येऊन म्हटलं "सर , इतकं ऊन आहे , जरा त्याचा विचार करा आशा उन्हात बारी असते बरमुडा आणि जाऊ द्या या वेळेस, फीस भरायची आज शेवटचा दिवस आहे " . हे ऐकल्यावर पीटी मास्तरांच्या च्या खिशातून जणू त्यांचे पाकीट मी काढल्यासारखा चेहरा करून माझ्यावर ओरडले " एकदा सांगितलं ना नाही जमणार , जरा नीट कपडे घालून या " बापरे, भर दुपार , पुन्हा घरी जा , पुन्हा या !
जरा धाडस करून पुन्हा विचारले "सर , अजून काही नियम बदलले का? म्हणजे जीन्स चालणार नाही , गॉगल चालणार नाही वगैरे" आंबट चेहरा अजून आंबट करून तो गुरू पेटलाच " चेष्टा करता का ? तुम्हांला नोटीसा वाचता येत नाही ,पोराकडे लक्ष नाही आणि इथे येऊन चेष्टा करता, चला निघा , काही बोलू नका " बापरे, मला काय माहित उन्हामुळे मीच नाही गुरुवर्य पण तापलेले . मनासमोर माझी २० वर्षांपूर्वीची शाळा त्यातले तेच पीटी टीचर सगळं सगळं उभं राहिलं. तडक तिथून निघालो , घरी आलो. बायको दारातच विचारते झाली" झालं का शाळेचं काम ?" "नाही, माझे कपडे ठीक नाही म्हणून परत आलो" बायकोला कळलेच नाही ,म्हणाले "आहो लग्नाला नाही , शाळेत फी भरायला जायचंय"
तिला घडलेली हकीकत सांगितली,तिने कपाळावर हातच मारला(स्वतःच्या).
"अहो , एकच तास उरला, जा लवकर"
मी आत गेलो चांगले कपडे घातले त्यावर 3 पीस सूट (आजकाल लग्नात घालता तसा) आणि कडक काळेभोर चकचकीत बूट !! म्हटलं काही कमी राहायला नको.
तडक पोहोचलो शाळेच्या गेट वर . स्वागतासाठी गुरुवर्य आणि रक्षामंत्री गेट वरच उभे . माझा अवतार बघितला आणि खो खो खो करून हसले...
तात्पर्य: काळ बदलला पण शाळा अजूनही शाळाच आहे. तिथला राजा तोच आहे,"पी टी टीचर". तुम्ही मोठे अधिकारी व्हा , मुलाच्या शाळेत तुम्ही सुदधा विद्यार्थीच. आधुनिक काळात नोकरी दूसरी मिळेल, वेळ पडल्यास नवीन घर घेता येईल पण "शाळा "? नको रे बाबा ..
(C) www.nitinshinde.com

Comments